ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एमडी अ‍ॅडमिशनच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा

बीड वृत्तसंस्था : वैद्यकीय शिक्षणासाठी उच्च पदवी (एमडी मेडिसिन) मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी केज पोलिसांनी एका सराईत आणि आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक केली असून, त्याने आतापर्यंत तब्बल ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी महाराष्ट्रासह पंजाब व गुजरातमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुकीत सहभागी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील फिर्यादी धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील रहिवासी असलेले डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (वय २७) असून, ते सध्या बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

आरोपी सौरभ कुलकर्णी याने ‘एस.के. एज्युकेशन संस्था’ नावाच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून डॉ. तोंडे यांच्याशी संपर्क साधला. एमडी मेडिसिनसाठी प्रवेश हवा असल्याचे समजताच त्याने वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कॉलेजची अधिकृत फी ९९ लाख रुपये असताना केवळ ६५ लाख रुपयांत प्रवेश मिळवून देतो, असे खोटे आश्वासन देत त्याने डॉ. तोंडे यांचा विश्वास संपादन केला.

या आमिषाला बळी पडून डॉ. तोंडे यांनी सप्टेंबर २०२४ दरम्यान रोख आणि ऑनलाईन व्यवहारातून आरोपीला एकूण ८ लाख रुपये दिले. मात्र, प्रवेश यादीत नाव न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने पैसे परत देण्यास नकार देत धमकावल्याने अखेर धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. तपासात आरोपीविरोधात नाशिक, सोलापूर, जालना, पुणे, मुंबई, नागपूर तसेच पंजाबमधील अमृतसर आणि गुजरातमध्येही एकूण १५ फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. गोपनीय माहितीच्या आधारे केज पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.

दरम्यान, आरोपीने आणखी किती डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचा सखोल तपास पोलीस करत असून, या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दलाली आणि फसवणुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!