मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले असताना, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर निवडणूक आयोगाने मतदारांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता राज्यातील २८ महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी आयोगाने महत्त्वाची स्पष्टता दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र (EPIC कार्ड) उपयुक्त असले तरी ते बंधनकारक नाही. एखाद्या मतदाराचे नाव अधिकृत मतदार यादीत नोंदलेले असेल, तर त्याला मतदानाचा अधिकार नाकारता येत नाही. त्यामुळे ‘मतदार कार्ड नसेल तर मतदान करता येत नाही’ हा गैरसमज असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
ज्या मतदारांकडे EPIC कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी मतदान केंद्रावर ‘वोटर स्लिप’ म्हणजेच निवडणूक पावती आणि त्यासोबत कोणतेही सरकारमान्य फोटो असलेले ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येणार आहे. मात्र, आयोगाने स्पष्ट केले आहे की केवळ वोटर स्लिप पुरेशी नसून ओळख पटवण्यासाठी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाने पर्यायी ओळखपत्रांची अधिकृत यादीही जाहीर केली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले पेन्शन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक तसेच कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यांचा समावेश आहे. यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर केल्यास मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल.
या निर्णयामुळे मतदार कार्ड हरवलेले, अद्याप न मिळालेले किंवा विसरलेले असलेल्या नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार असून, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.