मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत असून, सकाळपासूनच विविध जिल्ह्यांतून गोंधळ, आरोप-प्रत्यारोप आणि कारवाईच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात ईव्हीएममधील तांत्रिक अडचणी आणि पक्षांतर्गत बंडखोरीमुळे निवडणूक नाट्यमय वळणावर पोहोचली आहे, तर मुंबई व नालासोपारा परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अडचणीत सापडला आहे. या प्रभागात घड्याळ चिन्हाचे चार उमेदवार असताना, तुतारी चिन्हावर दोन बंडखोर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दिलीप शंकर अरुंदेकर आणि अक्षदा प्रेमराज गदादे यांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत उमेदवारी कायम ठेवली. विशेष म्हणजे अधिकृत उमेदवारी नसतानाही प्रचारात ज्येष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. या अनधिकृत वापराविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
याचदरम्यान, पुण्यातच ईव्हीएमबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. मतदानासाठी गेलेल्या अंकुश काकडे यांनी चौथ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतर त्यावरील दिवा न लागल्याचा दावा केला. त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारत तक्रार नोंदवण्याची मागणी केली. तक्रार नोंदवली जाईपर्यंत मतदान केंद्र सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, मुंबईतील चेंबूर (प्रभाग क्रमांक १५३) परिसरात मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बोगस ओळखपत्रासह मतदान केंद्राच्या आसपास फिरताना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला. या घटनेनंतर स्थानिक आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. रविंद्र महाडीक या संशयिताला गोवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो मध्यरात्री बीएमसी शाळेतील मतदान केंद्रात का शिरला होता, याचा तपास निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस करत आहेत.
एकीकडे मतदानाचा उत्साह, तर दुसरीकडे गोंधळ, तक्रारी आणि तणावपूर्ण घटना—अशा वातावरणात आज राज्यातील महापालिका निवडणुकांचे मतदान सुरू असून, प्रशासनाने ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.