---Advertisement---

मार्कर शाईवर वाद; निवडणूक आयोगाचा खुलासा, आता या शाईचा होणार वापर !

By team
On: January 15, 2026 6:31 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे आरोप समोर आले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, गेल्या १५ वर्षांपासून हाच मार्कर वापरात असून एकदा शाई सुकल्यानंतर ती निघू शकत नाही. काही लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यासाठी त्यांनी नेमके काय वापरले, हे आयोगाला माहिती नाही. समाजात फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मार्करचाच वापर होणार का, असा प्रश्न उपस्थित केला असता, वाघमारे यांनी महत्त्वाची घोषणा केली. मार्कर पेनच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ‘इंडिलेबल इंक’ म्हणजेच काडीने लावण्यात येणारी न पुसणारी शाई वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात मार्करऐवजी पारंपरिक शाईचा वापर केला जाणार आहे.

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रमही जाहीर केला आहे. १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार असून २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० नंतर निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल, तर मतमोजणी व निकाल ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून जाहीर केले जातील.

या निवडणुकांबाबत माहिती देताना आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षणाच्या निकषांतर्गत घेतल्या जात आहेत. राज्यातील एकूण १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!