चाळीसगाव वृत्तसंस्था : आर्थिक बँका, पतसंस्था आणि कर्जव्यवस्था सर्वांना परिचित आहेत. मात्र, पैशाऐवजी थेट शेळी-बकरीवर आधारित बँकही असू शकते, याची कल्पनाही अनेकांनी केलेली नसेल. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात हा अनोखा प्रयोग प्रत्यक्षात उतरला असून ‘गोअट बँक’ या नावाने ही व्यवस्था राज्यभरच नव्हे तर देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या या बकरी बँकेत कोणताही रोखीचा व्यवहार होत नाही. येथे कर्जाच्या स्वरूपात महिलांना शेळी दिली जाते आणि त्याच्या बदल्यात काही महिन्यांनी शेळीचे पिल्लू म्हणजेच करडू परत घेतले जाते. या अभिनव संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील गरीब, विधवा, परितक्त्या, एकट्या तसेच जमीन नसलेल्या महिलांना आर्थिक आधार मिळत आहे.
पुण्यातील सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून ही शेळी-बकरी बँक चालवली जाते. ज्या महिलांना पारंपरिक बँकांकडून कर्ज मिळणे कठीण जाते, त्यांच्यासाठी ही बँक आशेचा किरण ठरली आहे. या उपक्रमामुळे आतापर्यंत राज्यातील 300 हून अधिक महिला आत्मनिर्भर झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
या बँकेकडून केवळ शेळी देण्यात येत नाही, तर महिलांना पशुपालन व बकरी पालनाचे सखोल प्रशिक्षणही दिले जाते. प्रशिक्षणानंतर प्रत्येक महिलेला एक गर्भधारणा केलेली बकरी दिली जाते. अट एवढीच की, सहा ते नऊ महिन्यांत बकरी करडू जन्माला घालल्यानंतर एक करडू बँकेकडे परत द्यायचे असते.
सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माहितीनुसार, एक बकरी वर्षभरात तीन ते चार पिल्ले देते. त्यापैकी एक पिल्लू बँकेला परत केल्यानंतर उर्वरित पिल्लांची विक्री किंवा दूधविक्री करून महिलांना वार्षिक सुमारे 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे आणि महिला सशक्तीकरणाचे हे अनोखे मॉडेल सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.