मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुंबईत भाजपकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. या विजयोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत विजयाचे श्रेय थेट जनतेला आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई महापालिका तसेच राज्यातील इतर महापालिकांमधील हा विजय म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे फलित आहे. हा विजय जनतेला समर्पित आहे.” पुढे बोलताना त्यांनी विजयी उमेदवारांना जबाबदारीची जाणीव करून देत, “आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे लोकांची सेवा करा,” असा सल्लाही दिला.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील महापौरपदाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव न घेता सूचक विधान केले. “मुंबई महापालिकेत आपला विजय झाला आहे. त्यामुळे महापालिकेवर महायुतीचाच महापौर असेल,” असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. मात्र, महापौरपदासाठी नेमके कोणते नाव पुढे येणार, याबाबत स्पष्टता न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या या घवघवीत यशानंतर मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, आगामी दिवसांत महापौरपदाचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.