पुणे : वृत्तसंस्था
पुणे महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवकांसह विविध क्षेत्रांतील उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मात्र, यामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या दाम्पत्याचा मुलगा नगरसेवक म्हणून सभागृहात पोहोचल्याने ही निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ–पर्वती येथून अमर आवळे यांनी विजय मिळविला आहे.
अमर आवळे यांचे वडील पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागात बिगारी म्हणून, तर आई सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. सध्या हे दाम्पत्य आंबिल ओढा कोठीला येथे वास्तव्यास आहे. आंबिल ओढा झोपडपट्टीत लहानपण घालवलेल्या अमर आवळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण व सामाजिक कार्याची वाट निवडली.
आवळे हे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीत घाटे यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठिंबा दिला होता. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय योग्य ठरवत अमर आवळे यांनी जनतेचा विश्वास संपादन करत विजय मिळविला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घडलेला हा कार्यकर्ता आज महापालिकेच्या सभागृहात पोहोचला आहे. सध्या आवळे साने गुरुजी वसाहतीमधील महापालिकेच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या विजयाकडे सामाजिक समतेचे आणि संघर्षातून यश मिळविण्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.