ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कांद्याच्या माळेसह उमेदवारी अर्ज; माढ्यात शेतकरी पुत्राची भावनिक हाक

सोलापूर : वृत्तसंस्था

माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय धावपळ पाहायला मिळाली. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करत निवडणुकीची रंगत वाढवली असताना, मानेगाव जिल्हा परिषद गटातून शेतकरी पुत्र विश्वजीत पाटील यांनी आपल्या आंदोलनात्मक उमेदवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यल्प दरांविरोधात आवाज उठवण्यासाठी विश्वजीत पाटील गळ्यात चक्क कांद्याची माळ घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या अनोख्या कृतीची सध्या संपूर्ण माढा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वजीत पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकहाती संघर्ष करत असल्याची भावना व्यक्त केली. मात्र या लढ्यात कोणाचीही ठोस साथ न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कांदा हे शेतकऱ्यांचे खरे आभूषण असल्याचे सांगत, गळ्यातील कांद्याच्या माळेतून सध्याच्या शेतीच्या विदारक स्थितीकडे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जासाठी बँकांकडून होणारी अडवणूक, वारंवार होणारे नैसर्गिक संकट, अपुरी सरकारी मदत आणि वाढत्या शेतकरी आत्महत्या या गंभीर समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊनही त्यांना योग्य मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

“सोने हे धनवानांचे आभूषण असेल, पण माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यासाठी घाम गाळून पिकवलेला कांदाच खरे आभूषण आहे,” असे भावनिक उद्गार काढत विश्वजीत पाटील यांनी ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असल्याचे स्पष्ट केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे एका संघर्षशील शेतकऱ्याची व्यथा माढा तालुक्यातील जनतेसमोर ठळकपणे आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!