सोलापूर : वृत्तसंस्था
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापुरातून विमानसेवा आता गती घेत असून, येत्या आठवडाभरात सोलापूर–तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. त्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ही माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
दरम्यान, सोलापूर–मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस सुरू होणार असल्याची घोषणा संबंधित विमान कंपनीने केली आहे. मुंबईहून दुपारी १ वाजता उड्डाण घेऊन विमान दुपारी २.२० वाजता सोलापूरला पोहोचेल. तर सोलापूरहून दुपारी २.५० वाजता उड्डाण घेऊन मुंबईत ३.५५ वाजता दाखल होईल.
यापूर्वी बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यात आले होते. मात्र, ती जागा माळढोक पक्ष्यासाठी आरक्षित असल्याने प्रकल्प रखडला. त्यानंतर सुमारे ६० कोटी रुपये खर्चून होटगी रोड येथील विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरणानंतर प्रथम सोलापूर–गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली, ज्यास सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गोवा विमानसेवेचा लाभ सोलापूरसह लातूर, विजयपूर, इंडी, धाराशिव येथील प्रवासी घेत असून, अनेक प्रवासी गोव्यामार्गे बेंगळूरुलाही जात आहेत. या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यासही समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याने ही सेवा पुढे सोलापूर–मुंबई–इंदौर अशी विस्तारित करण्यात आली आहे.
सध्या इंदौरसाठी ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस चालू असून, पुढील आठवड्यापासून शुक्रवार वगळता सलग सहा दिवस ही सेवा उपलब्ध होणार आहे. सोलापूरहून मुंबईसाठी स्टार एअरचे विमान दररोज दुपारी ३ वाजता उड्डाण घेते व दुपारी ४ ते सव्वाचारच्या दरम्यान मुंबईत दाखल होते. त्यानंतर अर्धा ते पाऊण तास विश्रांतीनंतर हेच विमान इंदौरकडे उड्डाण घेणार आहे.
या विमानसेवांमुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, व्यापार, पर्यटन व धार्मिक प्रवासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.