---Advertisement---

लाडकी बहीण योजनेतील तक्रारींसाठी थेट संपर्क; विशेष हेल्पलाइन जाहीर

By team
On: January 24, 2026 10:34 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्य सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते.

अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेतील लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. या हेल्पलाइनवर संपर्क साधून लाभार्थी महिलांना हप्ता जमा न होणे, केवायसी, पात्रता, तांत्रिक अडचणी यासह विविध शंकांचे निरसन करून घेता येणार आहे. या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आदिती तटकरेंची पोस्ट 

आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत.

या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.

तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती,” असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आता महिलांना जर काही अडचणी आल्या तर त्यांना हेल्पलाइन नंबरवर फोन करून तक्रारीचे निवारण करता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!