---Advertisement---

शंभराव्या साहित्य संमेलनाची धुरा शरणकुमार लिंबाळेंकडे; सोलापूरचा मान पुन्हा उंचावला

Follow Us:
---Advertisement---

पुणे वृत्तसंस्था – मराठी साहित्याच्या इतिहासात शतकाचा टप्पा गाठणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कारप्राप्त डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे सोलापूर जिल्हा प्रमुख पद्माकर मा. कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत या निवडीचे स्वागत केले आहे. अनुभव, आकलन, वैचारिक खोली आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या साहित्यिकाची या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे, हा मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यात होणाऱ्या शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. लिंबाळे यांची निवड ही सार्थ आणि समयोचित असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान दुसऱ्यांदा मिळत आहे. यापूर्वी २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ निसर्गलेखक पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांची निवड झाली होती. आता डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीमुळे सोलापूरच्या साहित्यिक परंपरेचा गौरव पुन्हा अधोरेखित झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे १ जून १९५६ रोजी जन्मलेल्या डॉ. लिंबाळे यांचा कल जीवनप्रवास संघर्ष, जिद्द आणि ज्ञानसाधनेचा प्रेरणादायी दाखला आहे. टपाल व तार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. सोलापूर आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य – एक तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत राहून पुढे प्राध्यापक व संचालक पदावरून ते सेवानिवृत्त झाले.

डॉ. लिंबाळे यांनी सुमारे ४० ते ४४ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले. या आत्मकथनाचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून, इंग्रजीतील ‘द आऊटकास्ट’ या अनुवादामुळे त्यांच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथातून त्यांनी दलित साहित्याच्या समीक्षेला वैचारिक अधिष्ठान दिले. कादंबरी, कथा, कविता, आत्मकथन, चरित्र आणि साहित्यसमीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

‘सनातन’ या कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध साहित्यिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. २०११ मध्ये नांदेड येथे झालेल्या १२व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

शंभरावे साहित्य संमेलन हे केवळ शतकपूर्तीचा औपचारिक सोहळा न राहता मराठी भाषा, वाचनसंस्कृती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि नव्या साहित्यिक प्रवाहांना दिशा देणारे व्यासपीठ ठरावे, अशी अपेक्षा पद्माकर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. डिजिटल युगात वाचनसंस्कृती मजबूत करणे, नव्या पिढीला साहित्याशी जोडणे आणि विविध साहित्यप्रवाहांमध्ये संवाद घडवणे ही संमेलनाच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी असेल.

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली परिसंवाद, कविसंमेलने, चर्चासत्रे आणि ग्रंथप्रदर्शनांमधून समकालीन सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांवर व्यापक चर्चा घडावी. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता सामाजिक परिवर्तन, समता आणि संवेदनशीलतेचे प्रभावी साधन ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करत पद्माकर मा. कुलकर्णी यांनी डॉ. लिंबाळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पद्माकर मा. कुलकर्णी, सोलापूर जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!