पुणे वृत्तसंस्था : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचाही गैरवापर सुरू केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा सहायक असल्याचे भासवून पुण्यातील एका ४३ वर्षीय महिला डॉक्टरची तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याच्या गुन्ह्यात नाव आल्याचे सांगत अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ही रक्कम उकळली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात संबंधित महिला डॉक्टर यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ‘सायबर सेल ऑफ इंडिया’मधून बोलत असून, चौधरी आणि विश्वास नांगरे पाटील यांचा सहायक असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेररिस्ट फंडिंगच्या प्रकरणात आले असल्याचे सांगून घाबरवण्यात आले.
यानंतर दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून फोन करत आपण मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी असल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद मोबाईल क्रमांकाशी लिंक असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही अवैध जाहिराती आणि अश्लील संदेश पाठवून पैसे कमवत असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणातून वाचायचे असेल आणि अटक टाळायची असेल तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.
अचानक आलेल्या या फोनमुळे महिला डॉक्टर घाबरल्या. अटकेच्या भीतीने त्यांनी सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर तीन लाख रुपये ट्रान्सफर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी ही फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. नांगरे पाटील हे सध्या नागपूर शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील गुन्हा पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. आता हा गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असताना, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून पैसे मागितल्यास घाबरून पैसे ट्रान्सफर करू नयेत, असे आवाहन सायबर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत आहे.











