नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त असतानाच राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० हजार किलो स्फोटक जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (२५ जानेवारी) पोलिसांनी थानवला परिसरातील एका घरावर छापा टाकून ९,५५० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले असून सुलेमान खान या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नागौरचे पोलीस अधीक्षक मृदुल कच्छावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. तपासात आरोपीने मोठ्या प्रमाणावर स्फोटक साठवून ठेवल्याचे उघडकीस आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुलेमान खानने हा स्फोटक साठा आपल्या शेतात लपवून ठेवला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १८७ कार्टनमध्ये ९,५५० किलो अमोनियम नायट्रेट, डेटोनेटरचे ९ कार्टन, निळ्या वायरचे १५ बंडल, लाल वायरचे ९ बंडल तसेच इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.
एसपी कच्छावा यांनी सांगितले की, सुलेमान खानविरोधात यापूर्वी थानवला, पाडुक्कल्लन व अलवर परिसरात स्फोटकांशी संबंधित तीन गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे स्फोटक कायद्यान्वये नोंदवण्यात आले होते. या नव्या प्रकरणात आरोपीवर भारतीय न्याय संहिता तसेच स्फोटक अधिनियम १८८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक साठा आढळल्याने हे प्रकरण केवळ पुरवठ्यापुरते मर्यादित नसून मोठ्या कटाचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासात केंद्रीय तपास यंत्रणाही सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.