पुणे : वृत्तसंस्था
वाघोली परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, याच घटनेत 13 वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने ही मुलगी बचावली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय (मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड) ही सध्या वाघोलीतील बाईफ रोड परिसरात वास्तव्यास असून, तिनेच हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेत 11 वर्षीय साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला, तर 13 वर्षीय धनश्री संतोष जायभाय ही गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हे कृत्य घडले, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, वाघोली परिसरात अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात तणाव पसरला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.