मुंबई : वृत्तसंस्था
विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे, राज्याच्या कानाकोपऱ्याची सखोल जाण असलेले लोकनेते आज काळाच्या पडद्याआड गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले की, “अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था होती. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे, संवेदनशील आणि धाडसी नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण आहे.”
“अशा प्रकारचे नेतृत्व घडायला अनेक वर्षे लागतात. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अजितदादा अशा काळात आपल्यातून जाणे हे धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. वैयक्तिक आयुष्यात माझा एक दिलदार आणि दमदार मित्र मला सोडून गेला आहे,” अशा भावनिक शब्दांत फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.
या दुर्घटनेमुळे पवार कुटुंबावर मोठा आघात झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना होत आहेत. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा करून पुढील सर्व निर्णय कुटुंबाच्या संमतीने घेतले जाणार आहेत.
राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखावटा पाळण्यात येणार आहे. “अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. अजूनही हे सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.