बारामती : वृत्तसंस्था
बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांचे सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कापूक आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. एक निर्भय, कणखर आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमासाठी ते बारामती येथे आले असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात मुंबई पोलीस दलातील (२००९ बॅच) पोलिस शिपाई विदीप जाधव यांचेही कर्तव्य बजावत असताना निधन झाले. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे PSO म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलातही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
विमानाची सह-पायलट शांभवी पाठक यांनी परदेशात एव्हिएशनचे प्रशिक्षण घेतले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी DGCA कडून व्यावसायिक पायलट परवाना मिळवला होता. फ्रोझन ATPL, फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटिंग, AVSEC प्रशिक्षण तसेच A320 जेटवर ओरिएंटेशन प्रशिक्षण पूर्ण केलेली शांभवी एक कुशल आणि प्रशिक्षित वैमानिक होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. “ही घटना केवळ पवार कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. आजचा दिवस राज्यासाठी काळा दिवस आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. अजित पवार हे आपल्यासाठी मोठ्या भावासारखे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दुःख व्यक्त केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत, “महाराष्ट्र आणि सहकार क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमी स्मरणात राहील,” असे म्हटले आहे. या भीषण अपघातामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी नेतृत्व गमावले असून, राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.