---Advertisement---

भावनांचा पूर : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

By team
On: January 29, 2026 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पळणार? आता ‘DADA is love’ आम्ही कोणाला म्हणणार?” अशा भावनिक शब्दांनी भरलेली ही पोस्ट अनेकांच्या काळजाला चटका लावणारी ठरत असल्याचा दावा केला जात आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या मुलाने ही पोस्ट शेअर केल्याचे सांगितले जात असून, “DADA पोरखे झालोत” असे शब्द वापरत त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांना ‘महाराष्ट्राचे DADA’ संबोधण्यात आले असून, “जब तक सुरज चाँद रहेगा, अजित दादा आपका नाम रहेगा” अशा ओळींमुळे अनेकजण भावुक झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, काहींनी या भावनांचा स्वीकार केला आहे, तर काहींनी पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या पोस्टवरून कौतुकासोबतच चर्चा आणि वादही पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बारामती येथे खासगी विमानाच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात असून, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला आहे. कालपासून नागरिक, कार्यकर्ते, समर्थक आणि विविध पक्षांचे नेते बारामतीत दाखल होत असून, रस्त्यांवर गर्दी, डोळ्यांत अश्रू आणि वातावरणात शोककळा दिसून येत आहे. अनेकांनी “महाराष्ट्राने एक आक्रमक आणि निर्णयक्षम नेता गमावला” अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी देश व राज्य पातळीवरील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह विविध पक्षांचे नेते, मंत्री व खासदार बारामतीत येणार असल्याने प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण बारामती परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या शोकाकुल वातावरणात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली भावनिक पोस्ट राज्यभरात चर्चा, प्रतिक्रिया आणि प्रश्न निर्माण करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!