ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘विकसित भारताकडे दमदार पाऊल’ : अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था 

केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारताकडे एक दमदार पाऊल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, या अर्थसंकल्पामुळे देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा होणार असून, विशेषतः मध्यमवर्ग, शेतकरी, युवक आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक धोरणे आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे देशाची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा अर्थसंकल्प २१व्या शतकातील महत्त्वाचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, यामुळे ग्रामीण भागातील परिवर्तन, नागरिककेंद्रीत गुंतवणूक आणि दीर्घकालीन विकासाला चालना मिळणार आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार कमी होऊन देशाचे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी असेही स्पष्ट केले की, या अर्थसंकल्पाचा फायदा महाराष्ट्रासह सर्व राज्यांना होणार असून, केंद्र व राज्य सरकारांमधील समन्वय अधिक दृढ झाल्याने विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील.

सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिक वर्गासाठी हा अर्थसंकल्प लाभदायक ठरणार असल्याचा पुनरुच्चार करत, केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 हा विकसित भारताच्या दिशेने मोठे पाऊल असून, देशाच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारा ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!