नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज पहाटे ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५:३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक झालेल्या या भूकंपामुळे अनेक नागरिक घराबाहेर पळाले.
भूकंपाचे केंद्र बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टन परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्क्यांची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरातही कंपन जाणवले. काही सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याने घरांच्या खिडक्या व दरवाजे हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपानंतर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क करण्यात आले असून संवेदनशील भागांचे निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. काश्मीर खोरे हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात मोडत असून येथे वेळोवेळी सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.