ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे’ : अजित पवारांच्या अपघातावर भुजबळांचे विधान

नाशिक : वृत्तसंस्था 

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. “अजित पवार यांचे सरळ चाललेले विमान अचानक पलटी झाले. या प्रकरणात निश्चितच कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे,” असे खळबळजनक विधान भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरील संशयाचे मळभ अधिकच गडद झाले आहे.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशी सुरू केली आहे. मात्र चौकशीचा अहवाल येण्याआधीच विविध स्तरांतून शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

नाशिक येथे आयोजित शोकसभेत बोलताना भुजबळ म्हणाले, “देशात याआधी अनेक विमान अपघात झाले आहेत. मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारचा भयानक अपघात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ते विमान तिथे कसे आले, हेच समजत नव्हते. टेबल टॉप एरियातून ते तब्बल 50 ते 60 फूट खाली कोसळले होते.”

या अपघाताबाबत सीसीटीव्ही फुटेजचाही उल्लेख करत भुजबळ म्हणाले, “पार्थ पवारांकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज मी पाहिले. त्यामध्ये विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्यांदा सरळ असलेले विमान अचानक पलटी मारल्यासारखे दिसते. त्यानंतर काही क्षणांतच सगळे संपले.”

ते पुढे म्हणाले, “मी या क्षेत्रातील तज्ज्ञ नाही. मात्र अनेक लोकांशी चर्चा केली आहे. इंजिनमध्ये बिघाड असू शकतो, रडारमध्ये अडचण असू शकते किंवा आणखीही काही कारण असू शकते. चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. पण जी सोन्यासारखी माणसे गेली, ती कशी परत येणार?” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, “अजितदादांचे आयुष्य संघर्षमय होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली ते घडले. वेळेचे काटेकोर पालन, कामातील शिस्त, स्वच्छता आणि बारकावे यांचा ठेवा त्यांना पवारांकडून मिळाला होता. सकाळी सहा-सात वाजल्यापासून ते कामाला लागायचे. अधिकाऱ्यांना दिलेले काम नाही म्हणण्याची कुणाचीही हिंमत नव्हती.”

भुजबळांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या अपघाताबाबत सुरू असलेल्या चौकशीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, डीजीसीएच्या अहवालातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!