ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांनंतर बारामतीची पहिलीच निवडणूक; जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात !

पुणे : वृत्तसंस्था 

बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात एकाच वेळी मतदान सुरू असले, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांचा प्रतिसाद, मतदानाची टक्केवारी आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती याकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष दिले जात आहे.

मतदानाला सुरुवात होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सकाळी लवकर काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार यांची कामाची शिस्त आणि पहाटे मतदान करण्याची परंपरा सर्वश्रुत होती. त्याच परंपरेचा आदर्श ठेवत सुनेत्रा पवार यांनी पहिल्याच तासात मतदान करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

दरम्यान, अजित पवार यांची आई आशा पवार या देखील मतदानासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली. युगेंद्र पवार, शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी बारामतीतील कन्हेरी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. आमदार रोहित पवार हे पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मतदान माळेगाव नगरपरिषदेत, तर खासदार सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने ते आज बारामतीत मतदान करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अनेक राजकीय अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यातील १७ पैकी ११ नगरपालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी एकत्र असूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला यश मिळाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत रंगली होती. मात्र, प्रचाराच्या दरम्यानच अजित पवार बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचार यंत्रणा ठप्प झाली आणि संपूर्ण निवडणूक भावनिक छायेत गेली. अशा संवेदनशील वातावरणात मतदार कोणता कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!