ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खडकाळ जमिनीवर उभे राहतेय हिरवे स्वप्न : सोलापुरातील शेतकऱ्यांचा जंगलनिर्मितीचा निर्धार

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथे एक अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. खडकाळ आणि कोरड्या जमिनीवर जिथे पूर्वी केवळ झुडपे वाढत होती, तिथे आज शेतकरी प्रमोद इंगळे यांच्या पुढाकारातून जंगल उभे राहत आहे.

रोपे जिवंत राहावीत यासाठी इंगळे झाडांच्या मुळांभोवती सुक्या उसाचे अवशेष पसरवत आहेत. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पाण्याची बचत होते. या मोहिमेत ते एकटे नाहीत. तब्बल २५ ग्रामस्थांची टीम १०० झाडांचे संगोपन करण्यासाठी एकत्र काम करत आहे.

ही केवळ एका गावाची गोष्ट नाही. सोलापूर जिल्ह्यातील ४३ गावे आणि दोन तांड्यांमध्ये आतापर्यंत ६ हजारांहून अधिक रोपे लावून त्यांचे जतन करण्यात आले आहे. वाढते तापमान आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम यामुळे स्थानिक ग्रामस्थ चिंतेत असून, पर्यावरण संवर्धनासाठी ते पुढे सरसावले आहेत.

सोलापूरच्या गावांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पर्यावरण शाळां’मधून ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. या शाळांमध्ये माहितीपटांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. माजी आयआरएस अधिकारी विपुल वाघमारे यांनी सांगितले की, ‘लेट्स प्लांट ए ट्री इन द माइंड’ या घोषणेसह गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. दहा जणांची एक टीम गावोगावी जाऊन हवामान बदलाचे धोके आणि वृक्षारोपणाची गरज समजावून सांगते. त्यानंतर प्रत्येक गावात किमान १०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते.

अंजनगाव खिलोबा येथे ग्रामस्थ दर दहा दिवसांनी देणग्या गोळा करून टँकरद्वारे झाडांना पाणी देतात. प्रत्येक गाव झाडांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र निधी उभारत आहे. “फक्त झाडे लावून थांबता येत नाही, त्यांचे जतन करणे अधिक महत्त्वाचे आहे. आमचा परिसर समृद्ध व्हावा आणि पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी आम्ही हे करत आहोत. झाडे टिकली, तरच आमची मुले सुरक्षित राहतील,” असे प्रमोद इंगळे ठामपणे सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!