ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात उद्यापासून बारावी परीक्षा ; टोकन सिस्टम आणि कडक नियम

मुंबई : वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची मुख्य परीक्षा १० फेब्रुवारीपासून राज्यभर सुरू होत आहे. यंदा विक्रमी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३,३८७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत परीक्षा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि ‘पेपर लीक’ रोखण्यासाठी घेतलेले उपाय याबाबत माहिती दिली. यंदा मोठा बदल म्हणजे १० मिनिटांची प्रश्नपत्रिका वाचण्याची वेळ पेपर सुरू होण्यापूर्वी न देता शेवटी जोडण्यात आली आहे, जेणेकरून पेपर लीक होण्याची शक्यता कमी होईल.

विद्यार्थ्यांना मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक, आणि बोर्ड स्तरावर १० समुपदेशक नेमले गेले आहेत. पेपर सकाळी ११ वा. आणि दुपारी ३ वा. सुरु होईल, तर विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती ५०० मीटरच्या परिसरातील सर्व झेरॉक्स दुकान बंद, आणि केंद्रावरील वेब कॅमेरे व झूम लिंकद्वारे हालचालींचे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश करताना १ ते ५० यानुसार टोकन नंबर दिले जातील. बेडसे म्हणाले, “या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांना लेखनासाठी पुरेसा वेळ मिळेल.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!