---Advertisement---

दिल्लीतील हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ; विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

By team
On: February 10, 2026 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (९ फेब्रुवारी) रात्री अचानक दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि आज पहाटेच ते मुंबईत परतले. या गोपनीय आणि अल्पकालीन दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. दिल्लीत त्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतल्याची माहिती असून, या भेटीनंतर काही तासांतच ते मुंबईत परतले. मात्र, या अचानक झालेल्या दिल्ली दौर्‍यामुळे राज्यात आगामी काळात मोठे धोरणात्मक निर्णय किंवा मित्रपक्षांबाबत नवी रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या धावपळीच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्या आज सायंकाळी ६:४५ वाजता दिल्लीसाठी रवाना होणार असून, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे देखील असणार आहेत. उद्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत असले, तरी फडणवीसांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर लागलीच होणारी ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संदर्भात विलिनीकरणाबाबत आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांची दिल्लीवारी ही याच प्रक्रियेचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!