ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात सहा गटापैकी चार गटांवर भाजपचा झेंडा

पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व, शिंदे सेनेला केवळ चार जागा

अक्कलकोट : मारुती बावडे

अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश मिळवले असून सहा गटांपैकी चार गट भाजपाने जिंकले आहेत तर बारा गणापैकी आठ गणामध्ये भाजपने विजय मिळवून पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे.या निवडणुकीत भाजपच्या विरोधात केलेल्या महाआघाडीचा म्हणजे शिंदे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाला आहे.माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिंदे सेनेला मात्र दोन गट आणि पंचायत समितीच्या चार जागांवर समाधान मानावे लागले.

सोमवारी, सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला तहसील कार्यालयामध्ये प्रारंभ झाला.त्यानंतर टप्प्याटप्प्याने गट आणि गटनिहाय निकाल जाहीर होत गेले.मतमोजणीसाठी २४ फेऱ्या व १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी १८ तर पंचायत समितीसाठी ३५ उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील आणि आनंद तानवडे यांना अपेक्षित यश मिळाले नाही.तालुक्याच्या एकूण निकालावर जर नजर टाकली तर चपळगाव, कुरनूर,वागदरी,जेऊर,दहिटणे,सुलेरजवळगे, मंगरूळ,नागणसूर या आठ गणामध्ये भाजप तर शिरवळ,तोळणूर, सलगर आणि मुगळी या चार गणांमध्ये शिंदे सेनेने झेंडा फडकवला.गटामध्ये चपळगाव, जेऊर, मंगरूळ,  नागणसूर ह्या चार गटात भाजप तर वागदरी आणि सलगर गटात शिंदे सेनेचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी आणि बंधू सागर कल्याणशेट्टी हे विजयी झाले. सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे व कन्या शितल म्हेत्रे हे दोघेही विजयी झाले.माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती.त्यामध्ये त्यांचे बंधू प्रवीण तानवडे यांनीही आपली प्रतिष्ठा कायम राखली.मल्लिकार्जुन पाटील यांच्या वहिनी श्रुती पाटील यांना मात्र जेऊर गणातून पराभव पत्करावा लागला.

चपळगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या शांभवी कल्याणशेट्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या सुजाता भरमशेट्टी यांच्यात थेट लढत होती.त्यामध्ये कल्याणशेट्टी यांना १६ हजार २३८ तर भरमशेट्टी यांना ९ हजार ८० मते मिळाली.कल्याणशेट्टी ह्या ७ हजार १५८ मतांनी विजयी झाल्या. चपळगाव पंचायत समिती गणात शिवसेनेचे अशपाक आगसापुरे आणि भाजपचे सागर कल्याणशेट्टी आमनेसामने होते.त्यात अगसापुरे यांना ४ हजार ७०९ मते तर कल्याणशेट्टी यांना ७ हजार ३५० मते मिळाली.२ हजार ६४१ मतांनी कल्याणशेट्टी हे विजयी झाले. कुरनूर गणात भाजपचे विनोद मोरे यांना ७ हजार २५० तर शिवसेनेचे व्यंकट मोरे यांना ५ हजार २६३ मते पडली.१ हजार ९८७ मतांनी विनोद मोरे हे विजयी झाले.

वागदरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे प्रवीण तानवडे यांना १२ हजार ४९३ तर भाजपच्या राजश्री शेळके यांना ९ हजार ६५ मते मिळाली.यात तानवडे हे ३ हजार ४२८ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे मल्लिकार्जुन हत्ते यांना २८७ मते मिळाली.वागदरी पंचायत समिती गणात भाजपचे आप्पासाहेब किवडे यांना ५ हजार २२२, काँग्रेसचे नागेश घुगरे यांना ४७५ तर शिवसेनेचे संजय होळे यांना ५ हजार ७६ तर रासपचे सोमनिंग घोडके यांना १७९ मते मिळाली.किवडे हे १४६ मतांनी विजयी झाले. शिरवळ गणात भाजपचे राजेंद्र बंदीछोडे यांना ४ हजार १७६ तर शिवसेनेचे गणेश मोरे यांना ६ हजार २९९ तर रासपचे दत्तात्रय माडकर यांना २०२ मते मिळाली.२ हजार १२३ मतांनी मोरे विजयी झाले.

जेऊर जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे अश्वघोष बनसोडे यांना ९ हजार ७७१ तर भाजपचे विकास बुळळा यांना १० हजार ६८०,वंचितचे यशवंत इंगळे यांना ४४३, अपक्ष सत्यम कट्टीमनी यांना ३६ तर अपक्ष भुताळी कांबळे यांना ३०५ मते मिळाली.बुळळा हे ९०९ मतांनी विजयी झाले.जेऊर पंचायत समिती गणात विमल गव्हाणे (भाजप) यांना ५ हजार ८९७ तर श्रुती पाटील (काँग्रेस) यांना ५ हजार ७६२ मते मिळाली.गव्हाणे ह्या अवघ्या
१३५ मतांनी निसटता विजय मिळवला. दहिटणे गणात भाजपच्या माजी सभापती आशा इंगळे यांना ५ हजार ४५८ तर काँग्रेसच्या अनिता नडगम यांना ३ हजार ६८४ मते पडली.इंगळे यांनी नडगम यांचा १ हजार ७७४ मतांनी पराभव केला.

मंगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या सुज्ञानी बनसोडे यांना १० हजार १३१ तर विरोधी भाजपच्या शिवानी स्वामी यांना १२ हजार ७४२ मते मिळाली.२ हजार ६११ मतांनी स्वामी विजयी झाले.मंगरूळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या भुवनेश्वरी कोरशेट्टी यांना ४  हजार ९१२ तर भाजपच्या रश्मी हिप्परगी यांना ६ हजार २८७ मते पडली.१ हजार ३७५ मतांनी हिप्परगी विजयी झाले. सुलेरजवळगे येथे भाजपचे उत्तम वाघमारे यांना ६ हजार ६७४ तर राष्ट्रवादीचे प्रल्हाद वाघमारे यांना ४ हजार ६२८ मते मिळाली.भाजपचे वाघमारे हे २ हजार
४६ मतांनी विजयी झाले.

नागणसूर जिल्हा परिषद गटात शिवसेना
शिंदे गटाचे धनराज धानशेट्टी यांना ११ हजार ८६४ मते तर भाजपचे सिद्धाराम शिवमूर्ती ११ हजार ९४५ मते पडली. ८१ मतांनी शिवमूर्ती विजयी झाले.रासपचे संतोष शिंदे यांनी १३५ मते घेतली.तोळणूर गणात शिवसेनेच्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे यांना ७ हजार २४५ तर भाजपच्या सविता सोलंकर यांना ६ हजार ३६२ मते पडली.८८३ मतांनी शीतल म्हेत्रे ह्या विजयी झाल्या. नागणसूर गणात शिवसेनेच्या स्वाती उडचाण ४ हजार ६२४ तर भाजपच्या वैष्णवी सलगरे यांना ५ हजार ४८४ मते पडली.८६० मतांनी सलगरे विजयी झाल्या.

सलगर जिल्हा परिषद गटात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे यांना १३ हजार ९४३, भाजपचे सिद्धाराम बाके यांना ११ हजार ६१७ तसेच रासपचे दत्तात्रय माडकर यांना १९९ मते पडली.म्हेत्रे हे २ हजार ३२६ मतांनी विजयी झाले.मुगळी गणात शिवसेनेच्या संगीता पाटील यांना ७ हजार ४४४ तर भाजपच्या समृद्धी राठोड यांना ५ हजार ६ मते पडली.पाटील ह्या २ हजार ४३८ मतांनी विजयी झाल्या.सलगर पंचायत समिती गणात शिवराज बिराजदार यांना ६ हजार ४०७ मते तर भिमना सोलापूरे यांना ६ हजार ५५८ मते मिळाली.१५१ मतांनी सोलापूरे हे विजयी झाले.

गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सहा गटापैकी दोन भाजप, तीन काँग्रेस आणि एक अपक्ष उमेदवार काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यामुळे निवडून आला होता तर बारा पंचायत समिती गणा पैकी सहा काँग्रेस, चार भाजप आणि दोन अपक्ष उमेदवार निवडून आले होते.

एकहाती सत्तेमुळे विकासाला चालना मिळेल

अक्कलकोट तालुक्यातील जनतेने विकास कामांसाठी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला नक्की आम्ही पात्र राहू.अनेक वर्षानंतर पंचायत समितीवर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे गावोगावच्या विकासाला चालना मिळेल.
एक हाती सत्ता आल्यामुळे विकासाची गती आणखी वाढेल,अशी आशा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले यश हे कार्यकर्त्यांना निश्चितच बळ देणारे आहे.

सचिन कल्याणशेट्टी,आमदार

जागा कमी असल्या तरी उद्देश सफल

शिवसेना शिंदे गट हा पक्ष तालुक्यात नवीन होता. जागा कमी आल्या असल्या तरी हा पक्ष घरोघरी गावोगावी पोहोचावा, असा आमचा प्रमुख उद्देश होता. मिळालेल्या यशाबाबत आम्ही समाधानी आहोत.इतर ठिकाणी आमच्या काही उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. याचा आम्ही विचार करू. पण आमचा उद्देश सफल झाला आहे.

  • सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!