ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘वंदे मातरम’संदर्भात केंद्राचे नवे निर्देश; सरकारी कार्यक्रमांत उभे राहणे बंधनकारक

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था 

केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’ संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, सरकारी कार्यक्रमांमध्ये ते वाजवताना उपस्थितांनी सन्मानार्थ उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

मंत्रालयाच्या निर्देशानुसार, ‘वंदे मातरम’ कोणत्याही सरकारी कार्यक्रमात, सरकारी शाळांच्या उपक्रमांमध्ये तसेच इतर औपचारिक समारंभांमध्ये सादर केल्यास सर्वांनी उभे राहणे आवश्यक राहील. माध्यमांच्या अहवालानुसार, सुमारे ३ मिनिटे १० सेकंदांची सहा कडव्यांची आवृत्ती राष्ट्रगान ‘जन गण मन’पूर्वी वाजवली जाईल.

नवीन नियमांनुसार, तिरंगा फडकवताना, राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी व नंतर, त्यांच्या राष्ट्राला उद्देशून असलेल्या भाषणांपूर्वी व नंतर, तसेच राज्यपालांच्या अधिकृत कार्यक्रमांदरम्यान ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी सन्मान समारंभांमध्ये किंवा राष्ट्रपती उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्येही हे गीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र, चित्रपटगृहांना या नियमांमधून वगळण्यात आले असून, चित्रपट सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम’ वाजवणे किंवा प्रेक्षकांनी उभे राहणे बंधनकारक राहणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, ‘वंदे मातरम’वर यापूर्वी वाद निर्माण झाला होता. काही मुस्लिम संघटनांनी गीताच्या पठणास विरोध दर्शवला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपने काँग्रेसवर मूळ सहा कडव्यांऐवजी एक कडवे स्वीकारल्याचा आरोप केला होता. सध्या प्रचलित प्रथेप्रमाणे पहिली दोन कडवीच गायली जातात.

भाजपचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय गीतालाही राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगानाप्रमाणे समान सन्मान मिळावा, असे मत व्यक्त केले होते. तर काँग्रेसने या विषयाला आगामी निवडणुकांशी जोडले जात असल्याचा आरोप केला होता. सरकारच्या नव्या निर्देशांमुळे ‘वंदे मातरम’च्या सादरीकरणाबाबत स्पष्टता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!