ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राम सातपुते यांच्या हत्येचा कट? जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा !

सोलापूर  : वृत्तसंस्था 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने दैदीप्यमान विजय मिळवला असला, तरी साताऱ्यात घरातील सदस्यांच्या पराभवाचा धक्का बसल्याची कबुली देताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसच्या राजकारणाबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला.

गोरे म्हणाले, “जे मला गुंड म्हणतात, तेच खरे गुंड आहेत. माळशिरसमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी करण्यात आली. राम सातपुते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यामागे खुनाचा कट असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तपास सुरू असून सत्य बाहेर येईल.” खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या ‘गुंड’ या उल्लेखाला त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

साताऱ्यातील पराभवाबाबत बोलताना गोरे म्हणाले, “पराभवाची कारणे सांगण्याची मला सवय नाही. पराभव स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होते, त्यामुळे साताऱ्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले; मात्र तेच एकमेव कारण नाही.” पराभव आणि विजय दोन्ही अंतिम नसतात, सातत्य महत्त्वाचे असते, असे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केल्याबाबत विचारले असता, “चौकशी झालीच पाहिजे,” असे स्पष्ट मत गोरे यांनी व्यक्त केले. बारामती विमान अपघात प्रकरणाचा तपास सुरू असून ब्लॅक बॉक्स मिळाल्याने अधिक माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

सोलापूरमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना त्यांनी काही मंडळी पक्षाच्या वाढत्या यशाने अस्वस्थ असल्याचा आरोप केला. पालकमंत्री अपयशी ठरल्यास काय करायचे आणि बहुमत न आल्यास कोणाशी हातमिळवणी करायची, असा गुप्त आराखडा तयार करण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. हा विजय कोणत्याही एका नेत्याचा नसून भाजप संघटना आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!