पंढरपूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज ते पंढरपूर येथे उपस्थित होते आणि मराठा आरक्षणासह विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी सांगितले की, “मला मारायला उठले आहेत, सुपारी द्यायला लागलीत, पण मायबाप जनता आहे तोपर्यंत भीती नाही.”
जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले की, समाजातील गरीब, विद्यार्थी व तरुणांच्या भल्यासाठी त्यांनी नेहमी काम केले आहे. “मी गरीबांच्या लेकरासाठी काम करतो. समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणाऱ्यांना का मोठे करायचं? मला गोरगरीबांना मोठं करायचं आहे,” असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, “दोन वर्षात 58 लाख नोंदी दिल्या आहेत, सातारा संस्थानाचा आदेश निघणार. मी मराठे मोठे केले म्हणून माझा सुपारी देत आहेत. जवळचे लोक फोडून काहीही वदवून घेतात.” तसेच, त्यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि आरक्षणाचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले. “आरक्षण घ्या, लाजू नका,” असे उपस्थितांना सांगितले. जरांगे पाटील यांचा या सक्रियतेमुळे पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनाचे वर्तुळ राज्यात गरम होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.