पुणे : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला पंधरा दिवस उलटले असले, तरी त्यांच्या जाण्याची पोकळी कार्यकर्त्यांच्या मनातून अद्याप भरून निघालेली नाही. अनेकांना अजूनही ते आपल्या सभोवतालीच असल्याचा भास होतो. पत्रकार परिषदेत अचानक उपस्थित राहतील, सभेत एखाद्याला खडसावतील किंवा कार्यकर्त्यांच्या गराड्यात ठाम भूमिका मांडतील, अशी भावना अनेकांच्या मनात दाटून येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दादांना उद्देशून एक जाहीर भावनिक पत्र लिहिले आहे. “लव्ह यू दादा,” असे थेट शब्द वापरत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आयुष्याच्या ताटात पुढे काय वाढून ठेवले आहे, हे कुणालाही सांगता येत नाही,” असे म्हणत त्यांनी जीवनातील अनिश्चिततेची जाणीवही मांडली.
व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. राजकारणातही कार्यकर्त्यांचे आपल्या नेत्यांवर निस्सीम प्रेम असते, हे वास्तव आहे. मात्र यंदाचा व्हॅलेंटाईन डे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायक ठरणार असल्याचे वातावरण दिसून येत आहे. कारण, ज्यांच्यावर प्रेम व्यक्त करायचे ते नेतेच आता आपल्यात नाहीत, ही खंत अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. मिटकरींनी आपल्या पत्रातून हीच अस्वस्थता शब्दबद्ध केली आहे. राजकीय नात्यांपलीकडे जाऊन नेते आणि कार्यकर्त्यांमधील जिव्हाळा किती घट्ट असतो, याची जाणीव या पत्रातून प्रकर्षाने होते. दादांची उणीव, त्यांच्यावरील प्रेम आणि त्यांच्या स्मृतींना वाहिलेला शब्दांचा सलाम, यांचा संगम या पत्रात दिसून येतो.
मिटकरींच्या या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, कार्यकर्त्यांच्या मनात दडलेल्या भावना व्यक्त झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अजित पवारांच्या जाण्याचे दुःख सहज पचण्यासारखे नसल्याची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मिटकरी यांचे पत्र देखील वाचा…..
तिर्थरूप आदरणीय दादा.. ‘नमस्कार’….!
“माझे बुडविले घर । लेकर बाळे दारोदार । लावली काहार । तारातीर करोनी ।।”
आदरणीय दादा, आज व्हॅलेंटाइन डे! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती प्रेमळ भावना व्यक्त करण्याचा जागतिक प्रेम दिवस ! तुम्ही असताना प्रेम व्यक्त करण्याच मी हिंमत करू शकलो नाही, मात्र तुम्ही नसताना आज या पत्ररूपी शब्दपपंचातुन ती व्यक्त करावी वाटतेय!
तुम्ही दिवंगत झालात या शब्दावर माझा तरी विश्वास नाहीये. हा माझा वेडेपणा असेल पण माझं मन मानायला तयार होणार नाही. तुम्हीच मला २०१९ ला ऐकलं, पक्षात घेतलं, आणि जबाबदारी दिली, हवाई प्रवासात फिरवलं, आमदार केलं, घर उभारून दिलं. इज्जत दिली, राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. इतकंच नव्हे तर विदेशात पाठवले, वडिलांच दुःख विसरून ‘कामाला लावलं. शिस्त लावली, कामात रमण्याचा पाठ दिला, सगळं सगळं दिलं. अनेकांना अमोल मिटकरी हा अप्रिय वाटणारा. मात्र छोट्या समुहातील हा व्यक्ती तुम्हालाच प्रिय वाटला. यापूर्वी वडिलांना आवडलो मात्र त्यानंतर तुम्हालाचं प्रिय वाटला. पूर्वीही परिवाराने, समाजाने, नातेवाईकांने दुर लोटलं. परिवारात प्रेमाने बोलणारी आणि माझी वाट पाहणारे फक्त 4-5 माणसे. तेही माझ्यापेक्षा लहान. मी वाईट नसतांना वाईट ठरवल्या गेलो, पण दादा तुम्हीच मला समजून घेतलं. अनेकदा चुकलो, तुम्ही चुका दुरुस्त करून पुढं जायला शिकवलं. वाढदिवस असला की पहिला फोन तुमचा, सुख-दुःखात खबीरपणे पाठीशी फक्त दादा तुम्हीच! तुमच्या नावावर माझी प्रशासकीय ‘दादागिरी चालायची. तुमच्या नावावर जहागिरीदारी करत आलो. मला आमदार केल्याचा किस्सा आणि शप्पथ होईपर्यतची आश्यर्यकारक घटना व परिस्थिती आपल्यालाच मलाचं माहित होती. माझ्या गावाला मला आपल्यामुळ उजेडात आणता आलं. आपल्यामुळं गाव, परिवार, निसर्ग, शहर, जनता, पशुपक्षी, खेळ आदींवर प्रेम करायला शिकलो. शिवशाहू-फुले-आंबेडकर आपली श्रद्धा व विश्वास हा तुमच्यातील व माझ्यातील समान दुवा होता. स्वराज्यरक्षक या मुद्द्यावरील आपली भूमिका अवघ्या महाराष्ट्राने बघितली. ‘कुणीही जिवाचा न घडो मत्सर’ हा संत विचार तुम्ही जगलात व “जो जे वांछील तो ते लाहो” हा पसायदान स्वभाव तुम्ही अंगिकारला, हेचं तुमचं वेगळंपण! भीमा कोरेगावला दरवर्षी न चुकता अभिवादन करीत स्वाभिमानाने ‘जयभीम’ म्हणणारा तो करारी आवाज आज कानावर पडणार की नाही याची सल कायम चर्चेत टोचत राहणार! शिववेषात आलेल्या व्यक्तीला आपण घातलेला मुजरा, मुस्लिमांबद्दल असलेले प्रेम व जिव्हाळा सगळं सगळं आज हरवलं. आज माझ्याजवळ खुप काही आठवणी सांगण्यासारख्या असूनही काहीच सांगण्यासारखं नाहीये. ‘व्हॅलेंटाइन-डे’ हा तुम्हाला जनतेनं दिलेला आवाज ”लव्ह यु’ दादा….., दादा आय लव्ह यु. ‘आज खूप मिस करतोय दादा’… भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही. जीवनाचा शेवटचा दिवस गोड व्हावा हे प्रत्येकाला वाटतं, मात्र तुमच्या नशिबी तेही आलं नाही. सुखाच्या क्षणापेक्षा निंदानालस्ती देवानं दिली. आज एकादशी आहे, तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या अधिक प्रेमात पडलो, मात्र त्याने याच दिवशी तुम्हाला छेडलं. तो विठ्ठल आता सुटलाय… त्याच्याशी आयुष्यभर भांडण कायम राहील!
जय शिवराय.. जयभिम… जय महाराष्ट्र…
आपलाच, अमोल मिटकरी.