---Advertisement---

शिवरायांशी टिपू सुलतानांची तुलना; मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर कडाडून टीका

By team
On: February 14, 2026 7:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे, असे केलेले विधान राज्याच्या राजकारणात वादाचे केंद्र ठरले आहे. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेची मुक्तता केली. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य उभारणारे शिवराय होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाची तुलना टिपू सुलतानांसोबत करणे अत्यंत निंदनीय असून, हे लांगूलचालन असल्याची कठोर टीका त्यांनी केली. “अशा प्रकारची तुलना आम्ही कदापि सहन करणार नाही. सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्षाने याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत फडणवीस यांनी काँग्रेसच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, मुलुंड येथे घडलेल्या दुर्घटनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सुरू असलेल्या कामादरम्यान स्लॅब कोसळून अपघात झाला असून यात काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीए आणि राज्य सरकारकडून घेतली जात आहे.

या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून आवश्यक ती काळजी घेतली गेली होती का, याची तपासणी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्यभर सुरू असलेल्या प्रकल्पांचे तातडीने सेफ्टी ऑडिट करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!