---Advertisement---

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नका; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार !

By team
On: February 15, 2026 5:07 PM
Follow Us:
---Advertisement---

वर्धा : वृत्तसंस्था

टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका करत आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. “भाजपने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नयेत. प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म आणणे हा भाजपचा जुना डावपेच आहे. माझ्या विधानाला हिंदू-मुस्लिम दृष्टीकोन देऊन मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

सपकाळ यांनी कथितपणे टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती आणि माफीची मागणी केली होती. यावर उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, “मी अत्यंत विनम्रपणे आणि स्वाभिमानाने सांगतो की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची आन-बान-शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि त्यांची प्रेरणा आपल्या संविधानापर्यंत पोहोचलेली आहे.”

ते पुढे म्हणाले की, काल पत्रकारांनी कार्यालयात महामानवांचे, विशेषतः शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपले मत व्यक्त केले होते. “शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार दिला आणि त्याच आदर्शातून टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला, एवढेच मी म्हटले होते. मात्र माझ्या मूळ विधानाला बाजूला ठेवून वेगळाच अर्थ लावला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “ते माफीवीरांच्या पक्षाचे आहेत, म्हणूनच माझ्याकडे माफीची मागणी करत आहेत. माझे विधान ज्या संदर्भात केले गेले, त्यातून शिवाजी महाराजांविषयीचा स्वाभिमान स्पष्ट दिसतो.” यावेळी त्यांनी भाजपवर महापालिका निवडणुकीत टिपू सुलतानचा छायाचित्र वापरल्याचा दावा देखील केला. “निवडणुकीत त्यांना टिपू सुलतान चालतो, पण आता राजकारणासाठी वाद निर्माण केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. सपकाळ यांनी पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका विधानाचा उल्लेख करत भाजपला सवाल केला की, “सावरकरांनी केलेल्या विधानाचा निषेध भाजप करणार का?” तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली.

या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून, शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भातील विधानांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पुन्हा पेटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!