अक्कलकोट : प्रतिनिधी
तालुक्यातील नागनळळी येथील आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. आगामी परीक्षांना सामोरे जाताना प्रश्न नीट समजून घेऊन उत्तरे लिहावीत, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि कॉपीमुक्त, प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असा मौलिक सल्ला महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.
येणाऱ्या परीक्षेत प्रश्न नीट समजून घेऊन त्याला समर्पक उत्तरे लिहावीत, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर न करता कॉपीमुक्त व प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था, अक्कलकोटचे जेष्ठ संचालक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले. नागनळळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य मुजावर आय. एम. आणि मुख्याध्यापक शेख आर. जी. उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागनळळी आश्रमशाळेने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल ओंकार फडतरे आणि महेश टेंगळे या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी दहावीचे विद्यार्थी अभिषेक वाघे आणि प्रियांका बनसोडे यांनी शालेय आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी के एस एम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.मनोज जगताप यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या शिक्षण संकुलामध्ये CET, JEE व विविध स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनकेले जाते. अत्याधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर याच शिक्षण संकुलामध्ये कला व विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
श्री कल्याणशेट्टी यांनी वसतिगृह, स्वयंपाकगृह, भोजन व्यवस्था, प्रयोगशाळा, ग्रंथालय व शैक्षणिक साधनांची पाहणी करून नागनळळी आश्रमशाळा सोलापूर जिल्ह्यात नामवंत आश्रमशाळा म्हणून नावारूपास येत असल्याचे सांगितले. ही शाळा सर्व सुविधांनी सुसज्ज असून समाजातील वंचित मुलांसाठी सचिव जावेद पटेल निरपेक्ष भावनेने कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचे विशेष कौतुक करत इतर आश्रमशाळांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज बिराजदार, रुद्राक्ष वैरागकर, बदिऊजमा पटेल, प्रशांत राचट्टे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सोनटक्के यांनी केले, सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी केले, तर आभार शंभुलिंग बशेट्टी यांनी मानले.