---Advertisement---

सोलापूरमध्ये भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू !

By team
On: February 16, 2026 5:40 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने नागरिकांमध्ये हळहळ आणि चिंता निर्माण केली आहे. पुण्यातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर आता सोलापूर शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोलापूर शहरातील रूपभवानी मंदिर परिसरात ही घटना सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी हे तीन तरुण दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक माहिती नुसार, वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पहाटेची वेळ असल्याने परिसरात गर्दी फारशी नव्हती, परंतु दुर्घटनेने शहरभरात धक्का बसला आहे.

घटनेत मृत्यू झालेल्या तिघेही सोलापूर शहराचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. तरुण वयात तिघांचा मृत्यू झाल्याने शहरभरातून संवेदना व्यक्त होत आहेत आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि प्राथमिक तपास सुरू असून अपघात कसा घडला याचा शोध सुरू आहे. अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच पोलिसांनी या प्रकरणासाठी विशेष पथक नियुक्त केले असून अज्ञात वाहन चालकाचा लवकर शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. शहरात सलग अपघातांची मालिका सुरू असताना नागरिकांची चिंता वाढली असून प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!