अमरावती : वृत्तसंस्था
येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू, अध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष, यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राज्यातील राजकारण ढवळून काढले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पाच ते सहा नेते असे आहेत, जे प्रत्यक्षात भाजपचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. हे नेते थेट भाजपमध्ये न जाता राष्ट्रवादीत राहून पक्षाला आतून पोकळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप कडू यांनी केला.
भाजपपासून सावध राहण्याचा इशारा देताना कडू म्हणाले की, भाजप आपल्या मित्रपक्षांनाही संपवण्याचे राजकारण करतो. यापूर्वीही त्यांनी भाजपला “विषारी साप” अशी उपमा दिली होती. “भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रुत्व; पण आम्ही शत्रुत्व स्वीकारले आहे,” असे म्हणत त्यांनी थेट राजकीय आव्हान दिले. “ते कधीही नाग पाठवू शकतात,” या शब्दांत त्यांनी इशारा देत वातावरण तापवले.
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू असताना कडू यांनी भाजपवर संशयाची छाया टाकली. “भाजपने खांद्यावर हात जरी टाकला, तरी लोक म्हणतात हा मेला,” अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत कडू म्हणाले की, “पंधराशे रुपये देऊन मते मिळवायची आणि स्मार्ट मीटरद्वारे जनतेकडून पैसे वसूल करायचे, हीच सरकारची नीती आहे.” शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. “शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी गनिमी काव्याने आंदोलन छेडण्याचे संकेत दिले.
आरोग्य विभागातील निर्णयांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वी सिव्हिल सर्जनकडे असलेले औषध खरेदीचे अधिकार मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. टेंडर प्रक्रियेत कमिशनखोरी वाढल्याचा दावा करत “ना खाऊंगा, ना खाने दूंगा म्हणणारेच आज सर्वाधिक भ्रष्टाचार करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.दिव्यांग कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “ज्यांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार रोखणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आली आहे,” असे तीव्र शब्द त्यांनी वापरले.
राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद, भाजपवरचे आरोप, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून बच्चू कडू यांनी उघडपणे भूमिका घेतल्याने राज्यातील सत्तासमीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.