---Advertisement---

नंदनवनवरील ‘राज-शिंदे’ भेटीने राजकारणात खळबळ; नव्या समीकरणांची चाहूल?

By team
On: February 18, 2026 3:48 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अचानक ठरल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या भेटीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाले नसले, तरी तिचे राजकीय परिणाम काय असू शकतात याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

नंदनवन बंगल्यावर झालेल्या या बैठकीत कोणते मुद्दे चर्चिले गेले, याबाबत दोन्ही बाजूंनी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र शिंदेसेनेकडून विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. शिंदे यांनी राज ठाकरे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाली आणि त्यानंतर चर्चांना अधिकच वेग आला.

डिसेंबर २०२५ मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली होती. मात्र जानेवारीत जाहीर झालेल्या निकालांमध्ये विशेषतः मुंबई येथे या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यभरातील निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी तुलनेने कमकुवत राहिल्याचे चित्र समोर आले.

गेल्या महिन्यात मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी थेट लढत झाली होती. प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीवर कठोर टीका केली होती. मात्र निकालानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पुढील राजकीय वाटचालीत लवचिक भूमिका घेण्याचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले होते.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले आहेत. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती की भविष्यातील राजकीय समीकरणांची पूर्वतयारी, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः मनसेच्या अलीकडील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पर्याय खुले ठेवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगत आहे.

या भेटीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी आगामी काळात राज्यातील राजकारणात काही नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘राज-शिंदे’ भेटीमुळे महायुती व ठाकरे गटांच्या राजकारणात नवे वळण येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!