ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाची राजधानी हादरली : पतीकडून पत्नी व तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील चंदन पार्क परिसरात एका तरुणाने धारदार चाकूने पत्नी आणि तीन लहान मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात दिल्लीमध्ये आला होता. तो चंदन पार्क परिसरात भाड्याच्या घरात पत्नी आणि तीन मुलींसह राहत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो आझादपूर बाजार येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. बुधवारी सकाळच्या सुमारास त्याने पत्नी अनीता हिच्यासह ७, ५ आणि ३ वर्षांच्या तीन मुलींची चाकूने गळा चिरून हत्या केली. घरातून आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता.

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अटकेसाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

या घटनेमुळे चंदन पार्क परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, कुटुंब सामान्य होते आणि कोणताही मोठा वाद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नव्हते. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे सांगितले आहे. राजधानीत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!