छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची अतिरिक्त रक्कम वसुलीसंदर्भात तहसील कार्यालयाने काढलेल्या आदेशावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची ‘पठाणी पद्धतीने’ वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दानवे यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यातील कानकोरी येथील शेतकरी एकनाथ विनायक पवार यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीमुळे ४०८० रुपयांची अतिरिक्त रक्कम जमा झाली. त्यानंतर गंगापूर तहसील कार्यालयाने संबंधित रक्कम परत भरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. ठरावीक मुदतीत रक्कम न भरल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्यात येईल किंवा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटिसांमध्ये देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
“शेतकऱ्यांच्या खात्यात प्रशासनाच्या चुकीमुळे रक्कम जमा झाली असेल, तर त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांनाच धमकावणे अन्यायकारक आहे,” अशी टीका दानवे यांनी केली. महायुती सरकार शेतकऱ्यांना पिळण्यात देशात आघाडीवर असल्याचा आरोप करत त्यांनी हा ‘तुगलकी आदेश’ तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही दिला. दरम्यान, तहसील प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, या प्रकरणामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.