“सभागृहातील गदारोळ ठरलेलाच असतो?” : नीलम गोऱ्हेंचा पडद्यामागील ‘समन्वया’चा खुलासा !
नाशिकच्या विश्व मराठी संमेलनात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे विधान; सत्ताधारी–विरोधकांतील ‘गुप्त’ रणनीतीवर नव्याने चर्चा
नाशिक : वृत्तसंस्था
राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि सभागृहातील गदारोळ हा जणू रोजचाच भाग असला, तरी त्यामागे पडद्याआड वेगळीच समीकरणे जुळत असतात, असा खुलासा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. नाशिक येथे आयोजित विश्व मराठी संमेलनात बोलताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांतील ‘समन्वय’ उघड करत सभागृहातील कामकाजाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
परिसंवादात त्यांना “विधानभवनात होणारा गदारोळ हा कोणत्या व्याकरणाचा अलंकार आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गोऱ्हे म्हणाल्या की, विरोधक काही प्रश्नांवर गदारोळ घालतात, कारण त्यांना त्या विषयावर बोलण्याची संधी हवी असते. उदाहरणार्थ, एखाद्या मंत्र्याच्या कार्यालयात पैसे सापडल्यास विरोधकांना तत्काळ चर्चा हवी असते; मात्र नियमानुसार त्यासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक असते.
मुंबई-पुणे महामार्ग काही दिवसांपूर्वी बंद पडल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, काही वेळा तारांकित प्रश्नासाठीची मुदत संपलेली असते. अशा वेळी विरोधक आपला ‘धर्म’ पाळत आवाज उठवतात, तर सत्ताधारी पक्ष बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे व्यूहरचना आखतो. “सकाळीच आम्हाला माहित असते की विरोधक किती वेळ गदारोळ करणार. तुम्ही किती वेळात सभात्याग करणार, हेदेखील विचारले जाते. काही वेळा पीठासीन अधिकाऱ्याने १५ मिनिटे थांबायचे आणि नंतर कामकाज सुरळीत सुरू करायचे, असेही ठरलेले असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अपशब्दांच्या वापराबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, कधी कधी विरोधी पक्षातील नेत्यांकडून मुद्दाम किंवा नकळत अपशब्द वापरले जातात. अशावेळी सत्ताधाऱ्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते. सभापतीलाही नियमांनुसार निलंबनाची कारवाई करावी लागते. साधारणतः हे निलंबन सात दिवसांचे असते; मात्र संबंधित सदस्य दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ते तीन दिवसांवर आणले जाते, असे त्यांनी सांगितले.
विधिमंडळ हे चर्चेसाठीचे व्यासपीठ असून प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. “सभापती म्हणून आमची आमदारांवर करडी नजर असते. सदस्यांना वाटते की त्यांचे आपसातील संभाषण आम्हाला ऐकू येत नाही; पण तसे नसते,” असे सांगत त्यांनी एका सदस्यावर अंगविक्षेप केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या निलंबनाची आठवणही यावेळी सांगितली. गोऱ्हे यांच्या या विधानामुळे सभागृहातील गदारोळामागील खरे राजकारण काय, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.