ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विमान उड्डाण नियमांचे उल्लंघन आणि रोहित सिंहवर कठोर कारवाईची मागणी ; जय पवार !

मुंबई : वृत्तसंस्था

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुत्र जय अजित पवार यांनी सामाजिक माध्यमावर भावनिक आणि संतप्त पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे,” असे ते म्हणाले.

जय पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत VSR Ventures कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसल्याचा आरोप केला. “आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही,” असे ते म्हणाले.

जय पवारांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (DGCA) तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, व्हीएसआरची सर्व विमाने उड्डाणबंदी करावी आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई केली जावी. “ही मागणी प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी केली आहे,” असे त्यांनी म्हटले.

हवाई अपघात मंत्रालयाच्या AAIB तपास यंत्रणेचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. अहवालात कमी दृश्यमानता उड्डाण नियमांचे संभाव्य उल्लंघन नियंत्रण नसलेल्या विमानतळावरील सुरक्षेतील त्रुटी याकडे लक्ष वेधले आहे.

जय पवारांनी प्राथमिक अहवालावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, अहवाल पूर्ण आणि सखोल स्वरूपात तयार झालेला नाही. महाराष्ट्रातील जनतेसह अपघातात प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरांची अपेक्षा आहे.

त्यांनी DGCAला सुचवले की, व्हीएसआरच्या काही विमानांवर उड्डाणबंदी असली तरी इतर विमानांतही नियमभंगाची शक्यता नाकारता येणार नाही. जर गंभीर त्रुटी आढळल्या, तर संपूर्ण विमान ताफ्यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन, आवश्यक असल्यास संपूर्ण ताफ्याचे संचालन थांबवण्याचा विचार करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!