---Advertisement---

“आळस झटकून कष्टाला लागा”; मनोज जरांगे पाटलांचे सोलापुरातील युवकांना आवाहन !

By team
On: March 3, 2026 10:45 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  वृत्तसंस्था 

सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी युवकांना स्वावलंबन, कष्ट आणि एकजुटीचा संदेश दिला. आळस झटकून कष्टाला लागा, शिक्षणासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारा आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले.

जरांगे पाटील म्हणाले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक शेती व्यवसाय लाजिरवाणा मानू नये. उलट आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना शेतीत मदत करावी. “आपल्या मातीत काम करणे हे कमीपणाचे नाही, तर अभिमानाचे आहे,” असे ते म्हणाले. युवकांनी रोजगाराच्या संधी शोधताना आत्मविश्वास आणि मेहनतीची कास धरावी, असा संदेश त्यांनी दिला. समाजासाठी व्यापक मदत यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले. या यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील कोणत्याही भागातून शिक्षण, नोकरी, आरोग्य किंवा पोलीस स्टेशनमधील प्रकरणांबाबत मदतीची गरज भासल्यास अवघ्या पंधरा मिनिटांत प्रतिसाद दिला जाईल, असा दावा त्यांनी केला.

या उपक्रमासाठी स्वतःचे राज्यभरातील दौरे एक वर्षासाठी थांबवून पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “समाजासाठी संघटित आणि सक्षम व्यवस्था उभी राहिली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने बदल घडेल,” असे ते म्हणाले.

वैयक्तिक आयुष्यातील त्याग, आरोग्याच्या अडचणी आणि सातत्याने सुरू असलेला संघर्ष यांचा उल्लेख करत त्यांनी समाजासाठी लढण्याची आपली तयारी पुन्हा अधोरेखित केली. शेवटी, मराठा समाजाने अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकजूट राखावी आणि परस्पर सहकार्याची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. जरांगे पाटील यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!