ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधिमंडळ परिसरात आमदार कल्याणशेट्टी–जाधव यांच्यात शाब्दिक चकमक !

सरकारचा बाप काढणे अयोग्य :आमदार कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

विधिमंडळ परिसरात बुधवारी सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भास्कर जाधव यांच्यात हा वाद रंगला. आमच्या पक्षाचा किंवा सरकारचा बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का ? असा सवाल करत आमदार कल्याणशेट्टी यांनी जाधव यांना जाब विचारला. काही काळ दोन्ही आमदारांमध्ये तीव्र शब्दांत बाचाबाची झाली. ज्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा परिसरातील पोर्चमध्ये हा वाद घडला. जाधव यांनी कथितरित्या सरकारविरोधात अपशब्द वापरल्याचे कल्याणशेट्टी यांच्या कानावर पडले. त्यानंतर त्यांनी तत्काळ हरकत घेत जाधवांना तक्रार करायची असेल तर करा; मात्र अशा प्रकारे बापाचा उल्लेख करणे योग्य नाही,असे ठणकावून सांगितले. यावर जाधव यांनीही प्रत्युत्तर देत वातावरण अधिक तापले.

या वादामागचे कारणही समोर आले आहे.एका लग्न सोहळ्याच्या (दि.१५ मार्च) निमित्ताने आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून विधिमंडळ आवारात लग्नपत्रिकांचे वाटप केले जात होते. यावरूनच आक्षेप घेत जाधव यांनी टीका केल्याचे सांगितले जाते. पत्रिका वाटपाच्या पद्धतीवरून सुरू झालेला वाद पुढे वैयक्तिक उल्लेखांपर्यंत पोहोचला.

घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले,विधिमंडळ परिसरात आपण सर्व जण परिवारासारखे वावरतो. लग्नपत्रिका देणे-घेणे ही सामान्य बाब आहे. मात्र कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणे योग्य नाही. जर काही आक्षेप असेल तर तक्रार करावी. जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाला नाकारले आहे त्यामुळे ते व्यथीत झाले आहेत. त्या व्यथीत झालेल्या मनस्थितीतूनच हे असे बोलत आहेत. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून नाराजी असल्याने असे वक्तव्य झाले असावे,असेही त्यांनी सूचित केले.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.विधानसभा अध्यक्ष योग्य ती कारवाई करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे काही काळ विधिमंडळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय वर्तुळात या शाब्दिक चकमकीची जोरदार चर्चा सुरू असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाधव यांच्या विरोधात संतापाची लाट

भास्कर जाधव आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात झालेल्या वादावादीचे पडसाद मीडियावर देखील तीव्रपणे उमटले. जाधव यांच्या विरोधात आज दिवसभर भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संताप व्यक्त केला आणि तितक्याच उद्ववेगाने जाधव यांचा समाचार घेतला. अक्कलकोट शहर आणि तालुका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जाधव यांच्यावर सडकून टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!