---Advertisement---

अजित पवारांचा विमान अपघात की सुनियोजित कट?; विकास लवांडेंच्या विधानाने राज्यात खळबळ

By team
On: March 5, 2026 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच त्यांच्या मृत्यूबाबत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडें यांनी अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात नसून तो सुनियोजित हत्या असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता एक महिना उलटला असला तरी अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करत शासन आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे.

लवांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शासन आणि चौकशी यंत्रणांची भूमिका पाहता अजित पवारांचा मृत्यू हा सुनियोजित मर्डर असल्याचे ठाम मत तयार झाले आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अजितदादा हे कुणासाठी तरी मोठा राजकीय अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्यात आला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. इतिहासात अनेक प्रकरणे दडपली गेल्याचे उदाहरण देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विमान अपघातापूर्वी घटनास्थळाची ‘रेकी’ करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला.

रोहित पवार म्हणाले की, २०२३ मध्ये व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता तेव्हा तपास अधिकाऱ्याचे नाव अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील अहवालात कोणत्याही तपास अधिकाऱ्याचे नाव नसल्याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात कागदपत्रांची हेराफेरी होण्याची शक्यता असल्यानेच अधिकाऱ्यांनी आपले नाव टाळले असावे, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार अपघातापूर्वी काही संशयास्पद व्यक्ती त्या परिसरात आल्याचे आणि त्यांनी घटनास्थळाची रेकी केल्याचेही बोलले जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सीआयडी आणि सीबीआयमार्फत ‘क्रिमिनल अँगल’ने सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूबाबत झालेले हे गंभीर आरोप आणि दावे यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!