सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर–बार्शी मार्गावरील शेळगाव शिवारात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. राहुल संदीपान पवार (वय ३७) आणि गणेश महादेव क्षीरसागर (वय ३२) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे दारफळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पवार आणि गणेश क्षीरसागर हे दोघेही मळणी यंत्राच्या दुरुस्तीचे काम करीत होते. बुधवारी ते कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. काम पूर्ण करून ते आपल्या दुचाकीवरून (MH 13 S 3314) दारफळकडे परतत होते. दरम्यान, शेळगाव शिवारात समोरून येणाऱ्या टाटा अल्ट्रोझ कारने (MH 13 ES 4530) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी आणि कार दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांनाही गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश क्षीरसागर यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या अडीच वर्षांचा मुलगा आहे. तर राहुल पवार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. दोघेही कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सोलापूर–बार्शी मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने हा रस्ता ‘डेथ ट्रॅप’ बनत चालल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. या मार्गावर वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





