---Advertisement---

राज्यसभा जागेवरून मविआत धुसफूस; ‘मोठा पक्ष असूनही आम्हाला डावलले’ – आदित्य ठाकरे

By team
On: March 7, 2026 10:24 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीत (मविआ) अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला संधी न मिळाल्याची खंत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. “आमचा पक्ष मोठा असूनही तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला संधी मिळाली,” असे स्पष्टपणे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.

मात्र, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात नाराजीचे सूर उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाविकास आघाडीत आम्ही काही नियम पाळत होतो. त्यानुसार आघाडीत जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याला पहिली संधी मिळायला हवी. आमचा पक्ष मोठा असूनही संधी तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला मिळाली. मी जो दावा करत होतो तो निस्वार्थीपणे आणि पक्षाच्या हितासाठीच होता.”

तथापि, आघाडीत मतभेद वाढू नयेत म्हणून आपण नमती भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “राज्यसभेचा हा निर्णय इंडिया आघाडीच्या पातळीवर झाला आहे. या जागेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्हीही दावा केला होता. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी शरद पवार यांच्या नावावर एकमत केले. इंडिया आघाडीत वाद नको म्हणून आम्ही त्यांच्या निर्णयाला संमती दिली,” असे ते म्हणाले.

दरम्यान, या निर्णयामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. “आताची संधी हुकल्यामुळे कदाचित २०२९ पर्यंत आम्हाला पुन्हा राज्यसभेसाठी संधी मिळणार नाही. २०२८ मध्ये काँग्रेस आपला दावा करू शकते आणि मतांचा कोटाही वाढत आहे. त्यामुळे मी जे सांगत होतो ते पूर्णपणे पक्षाच्या हितासाठी होते,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून उमटलेली ही नाराजी आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!