मुंबई : वृत्तसंस्था
मनसेचा आज २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. राज ठाकरे कुटुंब सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून रोपवेच्या माध्यमातून ते गडावर गेले. गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले.
रायगडावर दर्शन घेतल्यानंतर मनसेच्या नव्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. ही नोंदणी उद्यापासून राज्यभर सुरू होणार असून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारी संघटना उभी करण्याच्या उद्देशाने पक्षाची स्थापना करण्यात आली. गेल्या दोन दशकांच्या प्रवासात ‘मराठी म्हणजे मनसे’ ही ओळख जनमानसात निर्माण करण्यात आम्हाला यश आले आहे.”
ते पुढे म्हणाले की, आज राज्यात कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर ‘मनसे कुठे आहे?’ असा प्रश्न इतर पक्षांचे समर्थकही विचारतात. यावरूनच पक्षाने समाजात निर्माण केलेला प्रभाव स्पष्ट होतो, असेही त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा वैभवशाली भूतकाळ पुन्हा वर्तमान आणि भविष्यात दिसावा, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
राज ठाकरेंची पोस्ट जशास तशी
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष झाली. 20 वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण 20 वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं!
राज पुढे म्हणतात, गेल्या 20 वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !
अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या 10 मार्च 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !
त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा. तुमचं मनःपूर्वक स्वागत असेल, असे ते म्हणाले.