ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार प्रकरणाला नवे वळण; ‘पायलटची चूक असण्याची शक्यता’ ; कंपनी मालकाचा सीआयडीसमोर जबाब

मुंबई : वृत्तसंस्था 

अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताच्या तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत. या दुर्घटनेत पायलटची चूक असण्याची शक्यता व्यक्त करत व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग  यांनी गुन्हे अन्वेषण विभागासमोर महत्त्वाचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात माझी काही चूक आढळल्यास कठोर शिक्षा द्यावी, असे त्यांनी चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

या अपघातानंतर या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू असून संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेबाबत अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहीत पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत विमान कंपनीच्या कार्यपद्धतीतील काही त्रुटींचा उल्लेख करत या घटनेत घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामती पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान अजित पवार यांचे पुत्र जय पवार  यांनीही या प्रकरणात आवाज उठवत सखोल तपासाची मागणी केली आहे.

तपासाचा भाग म्हणून सीआयडीने व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सलग तीन दिवस चौकशी केली आहे. मात्र या चौकशीदरम्यान नेमके कोणते मुद्दे विचारण्यात आले याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपास प्रक्रियेत गोपनीयता राखली जात असल्याचे सीआयडीकडून सांगण्यात आले आहे. अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपास, कंपनीची कार्यपद्धती तसेच विमान संचालनाशी संबंधित विविध बाबींची चौकशी सुरू आहे.

ही भीषण दुर्घटना २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली होती. मुंबई येथून बारामतीकडे जाणारे छोटे विमान बारामती विमानतळावर उतरवताना अपघातग्रस्त झाले. सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला आग लागून मोठा स्फोट झाला आणि विमान पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पायलट सुमित कपूर, सह-पायलट शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार त्या दिवशी मूळ नियोजित पायलट साहिल मदान ट्रॅफिकमध्ये अडकल्याने शेवटच्या क्षणी सुमित कपूर यांना विमान उडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!