सातारा : वृत्तसंस्था
शहरातील एका नामांकित शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर तपासात तब्बल 24 विद्यार्थ्यांना त्रास दिल्याचे समोर आले असून या प्रकरणी केअरटेकरला अटक करण्यात आली आहे. आज त्या केअरटेकरला सातारा पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता जामिनावर मुक्त केले.
पोलिस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील केअरटेकर ऋषीकेश सुभाष चव्हाण (मूळ रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात विद्यार्थ्यांना हात लावणे, धक्का देणे तसेच पैशांची मागणी करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी पुढे आल्या. सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पुढील चौकशीत आणखी विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे त्रास दिल्याचे समोर आले.
या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार लैंगिक छळाशी संबंधित असून लैंगिक अत्याचाराचा प्रकार नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित शाळा देशातील नामांकित शाळांपैकी एक मानली जाते. दरम्यान, या प्रकरणाबाबत शाळा प्रशासनाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाणे करीत आहे.