ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काम करा नाहीतर बाजूला व्हा ; राज ठाकरे यांचा मनसे पदाधिकाऱ्यांना कडक इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महिला विभाग, शाखा तसेच उपशाखा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मात्र बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दांत सुनावल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामात शिथिलता दिसून येत असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. “तुम्ही खाली काय करता याची मला पूर्ण माहिती मिळते. कोण काय काम करतंय आणि कोण निष्क्रिय आहे, हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत असतं. आता प्रत्येकाने नेमकं काय काम केलं हे मला पाहायचं आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितल्याचे समजते.

पक्षाच्या नावात ‘नवनिर्माण’ असताना कार्यपद्धतीत नवे उपक्रम दिसत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “सगळ्या गोष्टींचा मजाक बनवला आहे. जर काही नवीन करायचं नसेल, तर पक्षाच्या नावात असलेल्या ‘नवनिर्माण’चा अर्थ तरी काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बैठकीत सदस्य नोंदणीच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक कामात कोण किती सक्रिय आहे, याची आकडेवारी लवकरच समोर येईल, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या १९ तारखेला पक्षाच्या पुढील कार्यक्रमासाठी तयारी करण्याच्या सूचना देत स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवण्याचे निर्देशही दिले.

या बैठकीत महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही राज ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारले. “तुम्ही फक्त हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करता, पण महिलांसाठी त्यापलीकडे कोणते नवे उपक्रम राबवता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिलांसाठी समाजाभिमुख उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगत पक्षाचे काम केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजात सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या बैठकीनंतर मनसेच्या संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या कामात ढिलाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना ठोस जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी कार्यक्रम आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने मनसे अधिक सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!