ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ भरतीत रोस्टर घोटाळा : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा संताप !

मुंबई : वृत्तसंस्था

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप करत ‘रोस्टर घोटाळा’ उघडकीस आणला आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 1440 पदांच्या जाहिरातीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी आरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पडळकरांच्या मते, अनुसूचित जातीसाठी 13 टक्के जागा (71 जागा) आणि अनुसूचित जमातीसाठी 7 टक्के जागा (केवळ 15 जागा) दाखवण्यात आल्या आहेत, जे नियमविरोधी आहे. विशेष म्हणजे विमुक्त जाती (अ) व भटक्या जमाती (ब, क, ड) या प्रवर्गांसाठी ‘शून्य’ जागा दाखवल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पडळकर म्हणाले की, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या (Merit) जोरावर खुल्या प्रवर्गात जागा मिळवतात, तरी प्रशासन त्यांना त्यांच्या आरक्षित जागांवरच दाखवत आहे. परिणामी, खुल्या प्रवर्गात तब्बल 864 जागा (सुमारे 60 टक्के) दाखवल्या गेल्या आहेत, जो नियमबाह्य प्रकार आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल शहानिशा होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे. पडळकरांच्या मते, बिंदू नामावलीची योग्य तपासणी न करता जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे.

सोलापूरमधील रोस्टर तपासणीत तीन वेळा गंभीर चुका आढळल्याचे पडळकरांनी उदाहरणादाखल सांगितले. अनेक विभागांतील अधिकारी रोस्टरबाबत अजिबात गंभीर नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाविषयी सभागृहात आणि मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज दुपारी पडळकर स्वतः आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर पत्र देणार आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “जे अधिकारी जाणीवपूर्वक अशा चुका करून बहुजन समाजातील तरुणांचे नुकसान करत आहेत, त्यांना योग्य जागा दाखवावी,” असे त्यांचे ठाम विधान आहे. या आरोपांमुळे राज्यातील गट अ भरती प्रक्रिया आणि आरक्षण नियमांवरील नियंत्रण व प्रशासनाची पारदर्शकता या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!