---Advertisement---

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता !

By team
On: March 13, 2026 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपिटीचीही शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावी किंवा झाकून ठेवावी. तसेच वादळी वारे, पावसामुळे आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.

राज्यात सध्या हवामानात मोठा बदल जाणवत असून उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान वाढ होत आहे. कोकण किनारपट्टी भागातही पुढील 48 तास दमट आणि उकाड्याचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

14 आणि 15 मार्च दरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 13 ते 16 मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता, तसेच काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

15 आणि 16 मार्च दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे. राज्यातील इतर भागातही विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 72 तास राज्यभर हवामानात मोठा बदल होऊ शकतो असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!